जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
अवैध हातभट्टी दारू प्रकरणी वाघोली पोलिसांची धडक कारवाई
मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातून एक मोठी कारवाईची बातमी समोर येत आहे.
वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या देशी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करत सुमारे ८३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.
ही कारवाई दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.
भावडी रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल मंगेश जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, भावडी शिवारातील एका खाणीजवळील सुनसान शेतात गूळ मिश्रित रसायनांच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार केली जात आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. छापेमारीदरम्यान चार आरोपी अवैधरित्या दारू तयार करताना रंगेहाथ आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत रागिनी पंकज राठोड, वय २१ वर्षे सूरज धुणई कुमार, वय २० वर्षे शिवकुमार राममिलन कुमार, वय २० वर्षे पंकज मनोज राठोड (सर्व रहिवासी भावडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे)
पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध साहित्य जप्त केले असून त्यामध्ये सुमारे १८०० लिटर कच्चा गूळ मिश्रित रसायन, ९० लिटर तयार देशी हातभट्टी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि पाणी ओढण्यासाठी वापरण्यात येणारा पाइप यांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे किंमत ८३,५०० रुपये इतकी असून, हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळीच नष्ट केला आहे. आरोपींविरोधात प्रोहिबिशन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पुणे शहर श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग श्रीमती नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे व त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाची ही कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे.
पुणे शहर पोलिसांकडून अवैध दारू व्यवसायाविरोधात अशी कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























