जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
वानवडी पोलिसांची मोठी कारवाई. मॅफेड्रॉन एम.डी. अंमली पदार्थविक्री करणाऱ्या गुन्हेगारांस केले जेरबंद…
वानवडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी मॅफेड्रॉन म्हणजेच एम डी, या अंमली पदार्थांच्या विक्रीवर मोठी कारवाई करत एक गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.
दिनांक १६ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी, वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. त्याचदरम्यान दिपक क्षीरसागर आणि अभिजित चव्हाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरवर कमांड हॉस्पिटल गेट क्रमांक एकजवळ, लुल्लानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत थांबलेला आहे. त्याच्याकडे कोणतीतरी बेकायदेशीर वस्तू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी दोन पथकं तयार करून त्या ठिकाणी धाव घेतली.
अंधाराचा फायदा घेत संशयित इसम मोपेडवर कोणाची तरी वाट पाहत होता. पोलिस पथकाने सापळा रचताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला; मात्र चातुर्याने त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले. चौकशीत त्याचे नाव रोहन प्रकाश अंगारके, वय २२ वर्षे, राहणार गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे असे समजले.
अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून एकूण दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये ६ ग्रॅम ८० मिलीग्रॅम मॅफेड्रॉन म्हणजेच एम डी, हा सुमारे एक लाख छत्तीस हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ, एक काळ्या रंगाची बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ज्याची किंमत सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये, तसेच पंधरा हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा समावेश आहे. हा सारा मुद्देमाल त्याने अनाधिकृतरीत्या व विक्रीच्या उद्देशाने बाळगला होता.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे २१, दोन हजार पंचवीस असा दाखल करण्यात आला असून एन डी पी एस, ॲक्ट कलम ८(क), २१(ब) आणि २९ अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हे करीत आहेत.
सदर कारवाई माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, डॉक्टर राजकुमार शिंदे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री धन्यकुमार गोडसे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री विजयकुमार डोके यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या विशेष मोहिमेत सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्यासह पोलीस अंमलदार वया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, बालाजी वाघमारे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, अर्शद सय्यद, विठ्ठल घोरमले, आशिष कांबळे आणि दिपक क्षीरसागर या पथकातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
अंमली पदार्थाविरोधात कार्यवाहीसाठी वानवडी पोलीस दलाची ही मोठी आणि ठोस कारवाई ठरली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























