जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्यानं गळफास घेत संपवलं आयुष्य.
मार्शल मीडिया न्यूज पुणे : ऑनलाईन:- उरूळी कांचन : एका विवाहित पुरुषाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
पत्नी मानसिक त्रास देत असल्याकारणाने तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट करून शेअर केला होता. यात त्याने आपबिती सांगितली होती. या प्रकरणात महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुरज दामोदर पवार (वय वर्ष 32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मृत तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरज पवार आणि मयुरी जाधव यांचं लग्न झालं होतं. हे जोडपं कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत होते. बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झालं होतं.
भांडणादरम्यान, पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून सुरजने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ शूट केला.
व्हिडिओमध्ये त्याने मानसिक त्रास, भांडण आणि मारहाणीमुळे आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. त्याच्या आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तक्रारीनुसार मयुरी पवार हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले या करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख