जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
रांजणगाव पोलिसांची मोठी कामगिरी…
दरोड्याचे तयारीतील सहा आरोपीं रांजणगाव MIDC पोलीसांच्या जाळ्यात…
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- दिनांक, ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता डायल ११२ वर एक महत्त्वाचा कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने माहिती दिली की, रांजणगाव MIDC परिसरातील बंद पडलेल्या कंपनीमध्ये काही संशयित चोरट्यांनी प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे दांडे आणि टिकावसारखी हत्यारे आहेत, अशी माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तत्परतेने सक्रिय झाली.
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल संतोष आडसुळ यांनी ही माहिती तत्काळ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तपास पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना होण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पीएसआय अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर आणि पोलीस नाईक उमेश कुतवळ हे पथक तात्काळ कंपनी परिसरात दाखल झाले.
सिक्युरिटी गार्डकडून माहिती घेतल्यावर समजले की गुजरात नंबरची एक वाहन कंपनीजवळ दिसली होती आणि त्यातील संशयित इसम त्याला पाहताच पसार झाले होते. यानंतर पोलिसांनी खाजगी वाहनातून सर्च ऑपरेशन सुरू केले. काही वेळातच खंडाळामाथा परिसरातील नगर-पुणे महामार्गाजवळील एका हॉटेलसमोर गुजरात पासिंगची व्हॅगनर गाडी दिसली. पोलिसांना पाहताच वाहनातील सहा संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये संशयितांनी आपली नावे सुरेशभाई धामेचा, जितेंद्र डाभी, मेहुल धामेचा, भरतभाई सोळंकी, उत्सव डाभी आणि भरतभाई कोळी असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या एका मोबाईल फोनमध्ये बंद पडलेल्या कंपनीचे फोटो आढळून आले. वाहनाची पंचासमक्ष तपासणी करताना चोरीसाठीचे टिकाव, लोखंडी टोकदार चाकू, इतर साहित्य आणि सहा मोबाईल मिळून एकूण सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी MIDC मधील बंद कंपनीत स्क्रॅप आणि मौल्यवान धातू मिळण्याच्या संशयावरून चोरीचा कट रचल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध दरोडा व चोरीच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. माननीय. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर यांनी आरोपींना १२ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























