जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद
मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- खेड शहरात भरवस्तीमध्ये घडलेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनने आंतरराज्यीय सराईत टोळीच्या म्होरक्याला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ४७ लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(१), ३३१(४) आणि ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी मोतीलाल कांतीलाल गदिया, वय ५९ वर्षे, हे २ जानेवारी २०२६ रोजी देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले असताना त्यांच्या घराला कुलूप लावले होते. २ ते ३ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, कपाटे फोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व घड्याळे, असा सुमारे ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. तपासात पांढऱ्या रंगाच्या कारचा सहभाग निष्पन्न झाला असून ती कार नाशिकच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले.
सुमारे १२० किलोमीटरपर्यंतचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासात ही उत्तर भारतातील आंतरराज्यीय सराईत टोळी असल्याचे समोर आले, जी चारचाकी वाहनाने महाराष्ट्रात येऊन बंद घरांमध्ये घरफोडी करून पुन्हा उत्तर भारतात पळ काढत होती.
गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिझवान निजामुद्दीन शेख, वय ४२ वर्षे, याला पुणे-नाशिक महामार्गावर सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी व गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई आय-१० कार असा एकूण ४७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीवर यापूर्वी पुणे, कोल्हापूर, गुजरात व दिल्ली येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























