जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत
मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी गावाच्या परिसरात आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी यशस्वीपणे उलगडा केला आहे.
या प्रकरणात एकतर्फी प्रेमातून घडलेले दुहेरी हत्याकांड उघडकीस आले असून, आजपर्यंत चार खून केलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे.
दिनांक. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी काळखैरेवाडी येथील खैरेपडळ परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिला गंभीर जखमा झालेल्या असून उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी तपासाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक संशयित इसम दिसून आला.
तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी जैतू चिंधू बोरकर, वय ४३ वर्षे, राहणार. कोयंडे, तालुका. खेड यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीचे मयत महिला रंजना वाघमारे हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने, आधी सुरज वाघ या तरुणाचा खून करून, त्यानंतर सुपा परिसरात रंजनाचा देखील खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात खेड पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा दाखल असून आरोपीस दिनांक. २१ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास दिनांक. २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर खूनाचे गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























