जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त
मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- शिरूर शहरातील गॅरेज चालकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराचा मोठा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
या कारवाईत अहिल्यानगर जिल्ह्यातील धागेदोरे उघडकीस येत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल दहा किलो सातशे सात ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
दिनांक. १७ जानेवारी २०२६ रोजी गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, शिरूर येथील गॅरेज चालक शादाब रियाज शेख हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे.
खात्रीशीर माहितीच्या आधारे कायदेशीर परवानगी घेऊन दिनांक. १८ जानेवारी रोजी मध्यरात्री बाबुराव नगर परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईत शादाब शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक किलो बावन्न ग्रॅम मेफेड्रोन अंमली पदार्थ आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. पुढील चौकशीतून हा माल अहिल्यानगर जिल्ह्यातील चार आरोपींकडून घेतल्याचे उघड झाले.
यानंतर पोलिसांनी ज्ञानदेव शिंदे, ऋषीकेश चित्तर, महेश गायकवाड आणि शामसुंदर गुजर यांना अटक केली.
त्यांच्याकडून आणखी नऊ किलो सहाशे पंचावन्न ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत दहा किलो सातशे सात ग्रॅम अंमली पदार्थ, दोन मोटारसायकली आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























