जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कामगिरी…
सोशल मीडियावर भेटीस बोलवले; तरुणावर ७० हजारांची खंडणी, पोलिसांच्या शोधमोहीमेने ३ आरोपींना अटक
दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता ते ०८ डिसेंबर रोजी रात्री १ वाजेपर्यंत, प्रकाश दिनकर जोरी, वय २८ वर्षे, व्यवसाय डिलिव्हरी बॉय, याला गंभीर प्रकाराची खंडणी उकळण्याची घटना घडली.
फिर्यादीस सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मुलीने कात्रज चौकात भेटायला बोलावले. त्यानंतर दोघे मिळून बाईकवरून कात्रज घाटाकडे जात असताना, त्या मुलीचे साथीदार राहुल शितोळे, ऋषीकेश सुरते, तसेच इंस्टाग्राम अकाउंट mr_ak_302 आणि त्यांचे दोन साथीदार यांनी फिर्यादीला अडवले.
धमकी देत त्याला जबरदस्तीने येवलेवाडी येथे नेण्यात आले. तेथे अक्षय शेलार आणि त्याचे दोन साथीदार येऊन सर्वांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ केली, मारहाण केली, आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ७० हजार रुपयांची खंडणी मागितली.
या पैकी तब्बल १० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीकडून काढून घेण्यात आली. उर्वरित खंडणी रक्कमेबाबत आरोपी सतत फोन करून दबाव आणत होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ५५६/२०२५ नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाला तत्काळ शोधमोहीम राबवण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार पीएसआय निलेश मोकाशी आणि तपास पथकातील अंमलदार सतत शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता तीन आरोपी अक्षय गंगाधर बुधेवार, अमोल अंकुश शिंदे आणि राहुल तानाजी शितोळे यांना अटक करण्यात आली. तसेच प्रकरणातील विधी संघर्षित मुलीसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि थोरात करीत आहेत.
पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की, अशाप्रकारचा गुन्हा कोणासोबत घडल्यास त्यांनी त्वरित पोलिसांकडे माहिती द्यावी.
ही संपूर्ण कामगिरी माननीय. अमितेश कुमार, माननीय. रंजनकुमार शर्मा, माननीय. राजेश बनसोडे, माननीय. मिलींद मोहीते आणि माननीय. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























