जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…
मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बारामती भिगवन पिंपळे गाव रस्त्यावर एक भीषण अपघात घडला. बारामती येथील साखर कारखान्याकडे जात असताना ट्रॅक्टर आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर ट्रक ट्रॅक्टरमध्ये अडकल्याने ट्रॅक्टरला अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणातच संपूर्ण ट्रॅक्टर पेट घेतला.
या अपघातात ट्रॅक्टर चालवत असलेला चालक ट्रॅक्टरमध्येच अडकून पडला. रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा उग्र भडका इतका तीव्र होता की चालकाला बाहेर काढणे अशक्य झाले. परिणामी, ट्रॅक्टर चालकाचा जागीच जळून दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; मात्र तोपर्यंत ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाला होता.
या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. मृत ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून अपघात नेमका कसा झाला याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























