जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
बँक मॅनेजरने केली महिलेची ९४ लाखांची फसवणूक
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट एरिया मॅनेजरने खातेदार महिलेचा चेक घेऊन पैसे बँकेच्या खात्यात वर्ग न भरता स्वतः सह पत्नी व मैत्रिणीच्या खात्यात वर्ग करुन महिलेला बनावट पावत्या दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेची तब्बल ९३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोरेगाव भीमा शाखेतील असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वढू बुद्रक ता. शिरुर येथील योगिता आरगडे या महिलेच्या कुटुंबीयांनी कोरेगाव भीमा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये महिलेचे बचत खाते काढून शेतीच्या उत्पन्नातून मिळणारे पैसे सदर खात्यावर जमा केलेले होते. २०२३ मध्ये महिलेने बँकेत जाऊन तत्कालीन बँक मॅनेजर नेहा नलावडे यांना भेटून आमच्या खात्यावरील पैसे बँकेतील चांगला परतावा मिळणाऱ्या स्कीममध्ये गुंतवायचे असल्याबाबत सांगितले.
दरम्यान नेहा नलावडे यांनी योगिता यांना एरिया मॅनेजर विकास बेलदार यांना भेटण्यास सांगितले असता बेलदार यांनी महिलेला एक स्कीम सांगत त्यांच्या खात्यावरील काही चेक घेऊन महिलेसह महिलेचा भाऊ, आई, मावस भाऊ यांचे बँकेतील लाईफ फिक्स डिपोजीट स्कीमच्या वेगवेगळ्या पावत्या देऊन महिलेच्या खात्याचे तब्बल ९३ लाख ४० हजार रुपयांचे चेक घेतले. त्यांनतर महिलेच्या खात्यातील पैसे देखील वर्ग झाले, नुकतेच महिलेच्या सदर स्कीमची मुदत २०२५ मध्ये संपत असल्याने महिला सर्व पावत्या घेऊन बँकेत गेली असता सदर सर्व पावत्या बनावट असल्याचे समोर आल्याने महिला चक्रावून गेली.
त्यांनी बँकेचे स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यातील रक्कम विकास गुलाब बेलदार, सरला विकास बेलदार व राव बालाजी तेलंग यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर आल्याने, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोरेगाव भीमा शाखेतील तत्कालीन असिस्टंट एरिया मॅनेजर विकास बेलदार यांच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
त्यामुळे बँकेच्या एरिया मॅनेजर कडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने योगिता श्रीकृष्ण आरगडे वय ३९ वर्षे रा. चौफुला रोड वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार रा. लक्ष्मी नारायण नगर वडमुखवाडी चोली पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख